सावरकर नाट्यगृहाच्या समस्यांवर नाट्य परिषदेचा आवाज बुलंद; नगराध्यक्षांना निवेदन


रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहातील विविध प्रलंबित समस्यांबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रत्नागिरी शाखेने आक्रमक भूमिका घेत नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. नाट्यगृहातील मूलभूत सुविधा सुधारण्यासह कलाकार व रंगकर्मींच्या सोयीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

नाट्य परिषदेने नाट्यगृहातील बंद असलेल्या दिव्यांची दुरुस्ती, इमारतीच्या मागील बाजूस काँक्रिटीकरण, कलाकार व तंत्रज्ञांसाठी स्वतंत्र भोजन कक्षाची निर्मिती, तसेच तांत्रिक सुविधा अद्ययावत करण्यासाठी अतिरिक्त पॉवर पॅक, नवीन स्लाइडर आणि म्युझिक सिस्टीमसाठी स्टॅबिलायझर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

याशिवाय नाट्यगृहातील स्वच्छता राखण्यासाठी नियमित फिनेल पुरवठा, प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ नेण्यास बंदी, तसेच जाहिरात फलकांसाठी एकसमान चॅनलची व्यवस्था करण्याची सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे.

नाट्यगृह व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि रंगकर्मी यांची संयुक्त समिती स्थापन करून दर दोन महिन्यांनी बैठक घेण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्तावही नाट्य परिषदेने मांडला.

नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे आणि मुख्याधिकारी गारवे यांनी निवेदनाची दखल घेत मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष समीर इंदुलकर, कार्यवाह वामन कदम, तसेच श्रीकांत पाटील, मनोहर जोशी, घनश्याम मगदूम, दादा कदम आणि विजय पोकळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button