
चिपळूण शहरातील गुहागरनाका परिसरातील कब्रस्तान संरक्षक भिंतीची ठेकेदाराकडून तोडफोड
चिपळूण शहरातील गुहागरनाका परिसरातील कब्रस्तानासाठी कमानी बांघताना संबंधित ठेकेदाराने जुन्या संरक्षक भिंतीचे तोडलेले बांधकाम तसेच ठेवले आहे. असे असताना नगर परिषदेने ठेकेदाराला नव्या कामाचे सुमारे ८ लाख रुपयेही अदा केले आहेत. त्यामुळे तो या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यातच जुनी संरक्षक भिंत कोसळली असून यामुळे नवे बांधकामही ढासळले आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरातील गुहागरनाका, उक्ताड आदी भागासाठी हे मोठे कब्रस्तान आहे. त्यामुळे अलिकडे नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून कब्रस्तानमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. यातूनच काही महिन्यांपूर्वी सुमारे ८ लाख रुपये खर्च करुन लहान कमानी, शेड व बसण्यासाठी कट्टे बांधण्यात आले आहेत. हे काम परवडत नाही, असे म्हणत सुरूवातीला ठेकेदाराने कामासाठी मातीमिश्रित बाळू आणली होती. याची ओरड झाल्यानंतर नगर अभियंता दीपक निंबाळकर यांनी तपासणी केली. त्यात माती असल्याचे स्पष्ट झाले. तरीही थोडी चांगली वाळू आणून त्यात ही वाळू घेऊन काम करण्यात आले.
www.konkantoday.com




