
वोट चोर, गद्दी छोड’ देशाबाहेरही लोकप्रिय; राहुल गांधी
काँग्रेस पक्षाची ‘वोट चोर, गद्दी छोड’ ही घोषणा देशाबाहेरही लोकप्रिय ठरली असून, काँग्रेस ही घोषणा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवेल, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रायबरेलीमध्ये बोलताना केला.नेपाळमध्ये सध्या युवकांचे आंदोलन सुरू असून या आंदोलनादरम्यान तेथील युवकांनी वोट चोर…च्या धरतीवर ‘के.पी. चोर, गद्दी छोड’ अशी घोषणा दिली होती. त्याचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला असल्याचे मानले जात आहे.
राहुल गांधी हे आजपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर आले असून त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. लखनौ येथील चौधरी चरणसिंग विमानतळावर दाखल झाल्यानंतर राहुल यांनी माध्यमांशी संवाद साधला.काँग्रेस पक्षाने दिलेली ‘वोट चोर, गद्दी छोड’ ही घोषणा देशाबाहेरही लोकप्रिय ठरली आहे, असा दावा राहुल यांनी यावेळी केला. तसेच देशात सर्व ठिकाणी मतचोरीचा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडणार असल्याचेही राहुल यावेळी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या दौऱ्यादरम्यान रायबरेली येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी, सपचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांना आधुनिक काळातील ब्रह्मा विष्णू महेश असल्याचे संबोधत त्या आशयाचे फलक झळकावले. ‘भारताची अखेरची आशा, कलियुगातील ब्रह्मा-विष्णू- महेश’ असे या फलकांवर लिहिण्यात आले आहे.




