जगणं ‘इगो’ नाही, तर ‘इको फ्रेंडली’ असावंशासनाच्या विविध योजनांचा फायदा घेवून महिलांना स्वयंपूर्ण करा- जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते


रत्नागिरी, दि. 9 :- मानवी जीवनाची सुरुवात बिजांडातून सुरु होवून, ती ब्रम्हांडाच्या अनंतात विलीन होते. मानवाचे जगणं हे ‘इगो फ्रेंडली’ नसावे, तर ते ‘इको फ्रेंडली’ असावे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्ह्यात विविध योजनांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करुन देत आहेत. शासनाच्या या योजनांचा फायदा घेवून चक्रभेदी सोशल फाऊंडेशनने महिलांसाठी रोजगार निर्माण करावेत. त्यांना स्वयंपूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.

साडवली येथे चक्रभेदी सोशल फाऊंडेशनने विधवा महिलांसाठी सुरु केलेल्या ‘मायेचे हक्काचे घर’ निवारा केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, तालुकप्रमुख प्रमोद पवार, नेहा माने, माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, फाऊडेशनच्या अध्यक्ष वैदेही सावंत, निलेश चव्हाण आदी उपस्थित होते.


अज्ञान, अनिष्ट रुढी, प्रथा, अंधश्रध्दा यासारख्या चक्रांना भेदत चक्रभेदीने महिलांसाठी व पर्यावरणावर काम सुरु केले आहे. निराधार महिलांसाठी मायेचं हक्काचं घर निवारा केंद्र करुन काम सर्वोत्तम मानवी मूल्य जपण्याचे संवेदनशील काम केले आहे. हे प्रेरणादायी आणि आदर्श असे आहे. कोकणात रोजगाराच्या खूप संधी आहेत. शासन नवीन नवीन योजना राबवित आहे. आपण त्या योजनांची माहिती घेऊन रोजगार सुरू केले पाहिजेत.
कालच पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून बांबू परिषद झाली. प्रत्येक तालुक्यासाठी बांबू लागवड नोंदणी केंद्राच्या माध्यमातून मिशन मोडवर बांबू उत्पादनाचे काम सुरु होणार आहे. शासनामार्फत बांबू लागवडीसाठी शेतकऱ्याला सात लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. बांबूपासून विविध वस्तूदेखील महिला बनवू शकतात. अशा अनेक योजनांचा लाभ घ्यावा. त्यातून रोजगारनिर्मिती करुन स्वयंपूर्ण व्हावे, असेही श्री. सातपुते म्हणाले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल तसेच फाऊंडेशनला लागेल ती मदत केली जाईल, असे आश्वासन श्री. पवार यांनी दिले. वय वाढत गेलं की वयोवृध्द व्यक्तींना मानसिक आधाराची गरज असते, ती गरज हे निवारा केंद्र पूर्ण करेल, असे श्रीमती माने म्हणाल्या.
निवारा केंद्रामुळे निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होणार आहे. भविष्यात विधवा हा शब्दच त्यांच्या समस्या विझवणार आहे असे श्री. शिंदे म्हणाले. फाऊंडेशनला कोणत्याही स्वरुपाची मदत लागल्यास ती केली जाईल, असे माजी नगराध्यक्ष श्रीमती शेट्ये म्हणाल्या.
निवारा केंद्रासाठी रावसाहेब चौगुले यांनी स्वतः चे घर दिल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सावंत यांनी केले. तर सूत्रसंचालन युयुस्तू आर्ते यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button