
माचाळ येथील निसर्गसंपन्न परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून सातत्याने धुडगूस, बेशिस्त वर्तन, पोलिसांची कारवाई.
लांजा जवळील माचाळ येथील निसर्गसंपन्न परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून सातत्याने धुडगूस, बेशिस्त वर्तन आणि ग्रामस्थांशी दादागिरीचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारींनंतर अखेर लांजा पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी २ जुलै रोजी माचाळ येथे जात बेशिस्त पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे अनेक हुल्लडबाज पर्यटकांची धांदल उडाली.गेल्या काही दिवसांपासून माचाळ परिसरात येणारे पर्यटक मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी होत्या. मद्याच्या बाटल्या फोडणे, खाण्याचे उरलेसुरले पदार्थ रस्त्यात टाकणे, अश्लील वर्तन करणे आणि ग्रामस्थांना त्रास देणे असे प्रकार वाढले होते. विशेषतः मुचकुंदी ऋषींच्या गुहेजवळ मद्यप्राशन करून त्या पवित्र स्थळाची विटंबना केली जात असल्याने ग्रामस्थ संतापले होते.
ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. अखेर बुधवार २ जुलै रोजी धडक मोहीम राबवली. या कारवाईत अनेक बेशिस्त पर्यटकांना दंड ठोठावण्यात आला.या मोहिमेत पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, फौजदार सचिन भुजबळराव, पोलीस शिपाई किशोर पवार, महिला पोलीस प्रियांका कांबळे आणि चालक उमाजी बजागे आदींनी सहभाग घेतला.