
‘सेवा संकल्प अभियाना’ अंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत ‘आशीर्वादाचा दिवा’ अनाथ प्रमाणपत्रधारक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रज्वलित केला दिवाजिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन
रत्नागिरी, दि. १ ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील अनाथ प्रमाणपत्र मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन २९ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा भावनिक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा थेट लाभ घेता यावा यासाठी त्यांना दिव्यांगांच्या धर्तीवर शिक्षण तसेच शासकीय पदभरतीमध्ये रिक्त पदांवर १ टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे. या आरक्षणासाठी आवश्यक असलेले अनाथ प्रमाणपत्र ‘संस्थाबाह्य’ व ‘संस्थात्मक’ अशा दोन संवर्गांत विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्यामार्फत निर्गमित केले जाते. या प्रमाणपत्राचा लाभ मिळालेल्या मुलांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची भावना निर्माण करण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन आशीर्वादाचा दिवा लावण्यात आला.
जिल्हाभरात जनजागृती मोहीम
सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबरपासून रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, मंडणगड, दापोली आणि खेड या सर्व तालुक्यांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम सुरू आहे. यामध्ये ग्रामपंचायती, शाळा-महाविद्यालये तसेच आदिवासी वस्त्यांवर जाऊन लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
या मोहिमेदरम्यान महिलांचे कायदे व हक्क, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना, बालकांविषयीचे कायदे, त्यांची सुरक्षितता, चाईल्ड हेल्पलाइन (१०९८), महिला हेल्पलाइन (११२) आणि महिला व बाल विकास विभागाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.




