
पंढरपूर, अष्टविनायक दर्शन आता वाजवी दरात; खासगी ट्रॅव्हल्सना परिवहनमंत्र्यांचे आवाहन!
राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य भाविकांसाठी एक दिलासा देणारी घोषणा – एसटी महामंडळ आता धार्मिक पर्यटनात उतरतेय! अष्टविनायक, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर अशा प्रमुख तीर्थक्षेत्री जाणाऱ्या सहली आता एसटीच्या माध्यमातून वाजवी दरात अनुभवता येणार आहेत.परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे खुले आवाहन केले आहे.
एसटी मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “राज्यभरातून दरवर्षी लाखो भाविक धार्मिक स्थळांना भेट देतात. मात्र, अनेकांना आर्थिक अडचणींमुळे ही स्वप्नपूर्ती शक्य होत नाही. आता एसटी आणि खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या ऐतिहासिक भागीदारीतून धार्मिक सहली उपलब्ध होतील, ज्या सर्वसामान्यांना परवडतील आणि सुविधा देखील उत्तम असतील.”
रिकाम्या सीट्स, आता संधीचा प्रवास!
सुट्ट्यांमध्ये एसटीच्या अनेक गाड्या अर्धवट भरतात किंवा रिकाम्याच धावतात. या रिकाम्या सीट्सचा उपयोग धार्मिक पर्यटनासाठी करून महसूलात वाढ करण्याचा मंत्रच यामागे आहे. यातून एसटीलाही उत्पन्न मिळेल आणि भाविकांनाही सुलभ प्रवास.
श्रावणात सहलींची सुरुवात – नवा अध्याय सुरू
मंत्री सरनाईक यांनी जाहीर केलं की येत्या श्रावण महिन्यापासून अष्टविनायक, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर अशा सहलींचे आयोजन सुरू होईल. भोजन, निवास, स्वच्छता अशा सर्व सुविधा एका पॅकेजमध्ये वाजवी दरात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असेल.
भागीदारीतून पर्यटन, रोजगार आणि श्रद्धा यांना चालना!
या उपक्रमामुळे धार्मिक पर्यटनाला नवा आयाम मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना, रोजगार निर्मिती आणि श्रद्धास्थळांचा विकास घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.