अकरावीसाठी कोटाअंतर्गत प्रवेश आजपासून, सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध !


राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अंतिम करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी (११ जून) प्रसिद्ध करण्यात आली. तसेच गुरुवारपासून (१२ जून) कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून, कोट्यातील प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत संकेतस्थळ बंद पडण्यापासून वेगवेगळ्या प्रकारे गोंधळ झाला आहे. त्यामुळे पहिल्या फेरीच्या वेळापत्रकात अनेकदा बदल करावा लागला. अखेरीस सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी संकेतस्थळावर, तसेच विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

अल्पसंख्याक, इनहाऊस, व्यवस्थापन कोट्याअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगइनमध्ये गुरुवारी (१२ जून) सकाळी नऊ वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर महाविद्यालयांकडून कोटानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना संपर्क केला जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ जून रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा कालावधी मिळणार आहे. कोटाअंतर्गत प्रवेश निश्चित करणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल. प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रवेश फेऱ्यांतून वगळली जातील, असे नमूद करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button