नौकामालकांच्या स्पष्टीकरणानंतर ’मत्स्य’च्या भूमिकेकडे लक्ष

मत्स्य विभागामार्फत ड्रोनच्या हवाई गस्तीत दिसून आलेली नौका आमच्या मालकीची नाही. आमच्या नष्ट झालेल्या किंवा वापरात नसलेल्या नौकांचे नाव व क्रमांक आपल्या नौकांवर लावून अन्य कुणीतरी अवैध मासेमारी करतोय, असे स्पष्टीकरण दोन नौकामालकांकडून दिले गेल्यानंतर मत्स्य विभाग आता या प्रकरणी कोणती भूमिका घेणार, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. मत्स्य विभाग सुनावणीअंती संबंधित नौकामालकांवर दंडात्मक कारवाई करून प्रकरण निकाली काढणार की सर्वप्रथम ड्रोनमध्ये दिसून आलेल्या नौकांचा शोध घेऊन त्या ताब्यात घेणार, याकडे मच्छीमारांचे लक्ष लागून आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या रत्नागिरीतील दोन नौकांना मत्स्य विभागाच्या ड्रोनने हेरले होते. ड्रोनमध्ये दिसून आलेल्या नाव व क्रमांकानुसार संबंधित नौकामालकांना सुनावणीस हजर राहण्यासंदर्भात येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र कारवाईच्या ’रडार’वर आलेल्या त्या नौका आमच्या नाहीच, असे त्या नौकांच्या मालकांनी स्पष्ट केले होते. एका मच्छीमाराने सांगितले की, आपली नौका रस्सी तुटून वाहून जात केव्हाच नष्ट झाली आहे. तर दुसर्‍या मच्छीमाराने आपली नौका कार्यक्षम नसल्याने आता ती वापरात नाही. तसेच मत्स्य विभागास हवे असल्यास आपली खरी नौका प्रत्यक्ष तपासणीसाठी सादर करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता वापरात नसलेल्या नौकांचे नाव व क्रमांक वापरून मासेमारी कोण करतोय याचा शोध सागरी सुरक्षा यंत्रणेने घ्यावा, अशी मागणी संबंधित मच्छीमारांनी केल्यामुळे मत्स्य विभाग आणि सागरी सुरक्षा यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button