नंदकुमार मोहिते यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धा कोकणी कलाकार व इरलं संस्था यांच्या वतीने आयोजन

रत्नागिरी : वाचन आणि अभिव्यक्तीची आवड असणाऱ्यांसाठी कोकणी कलाकार व इरलं संस्था यांच्या वतीने शिक्षणमहर्षी नंदकुमार मोहिते साहेब यांच्या स्मरणार्थ”वाचता वाचता बोलू काही” या राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नंदकुमार मोहिते शरीराने निघून गेले असले तरीही विचारांनी ते कायम आमच्यासोबत आहे आणि राहतील, याची आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना कायम जाणीव आहे आणि ती राहील. त्यांनी बहुजनांच्या अनेक प्रश्नांवर वाचा फोडण्याचे काम केले असून, अनेकांचे प्रश्न कायमचे मार्गी लावले आहे. सामाजिक चळवळीतून त्यांनी बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम निस्वार्थीपणे केले आहे. बहुजन समाजाच्या संघटनातून एक प्रशस्त शिक्षण संकुल उभे केले. त्यातून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारे उघडून दिली. त्यांचे कायम म्हणणे असायचे की, आपल्या मुलांनी योग्य ते शिक्षण घेऊन वंचित, दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.

आपल्या मुलांनी स्वतःच्या शिक्षणातून सामाजिक भान जपले पाहिजे. त्यातून ही मुले स्वतः सक्षम होऊन पुढे समाज सक्षम करतील, असा त्यांचा विश्वास होता. त्या हेतूनेच त्यांच्या स्मरणार्थ आम्ही राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आदरांजली देण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी भावना कोकणी कलाकार व इरलं संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली.

या स्पर्धेसाठी इंधन (हमीद दलवाई), भाकरी आणि फूल (मधू मंगेश कर्णिक), मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (माधव कोंडविलकर), उजव्या सोंडेच्या बाहुल्या (प्रवीण दशरथ बांदेकर), आयदान (उर्मिला पवार), रानवीचा माळ (अभिजीत हेगशेट्ये), ऑक्टोपस (श्री. ना. पेंडसे), एस.ई.झेड (शंकर सखाराम), कोंडुरा (चि. त्र्यं. खानोलकर), धावटा धोटा (मामा वरेरकर) ही पुस्तके निवडण्यात आली आहेत.

स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रुपये ७ हजार, ५ हजार आणि ३ रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत १८ ते २१ वयोगटील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. दिलेल्या पुस्तकांपैकी कोणतेही एक पुस्तक निवडायचे असून, त्याचे परीक्षण व्हिडिओ स्वरूपात (७ मिनिटे) करायचे आहे. ही चित्रफित कोकणी कल्लाकार या युट्युब चॅनेलवर सर्वांसाठी खुली करण्यात येईल. परीक्षणाच्या सुरुवातीला नाव, पत्ता, वय, महाविद्यालय, पुस्तकाचे नाव आणि लेखकाचा परिचय द्यावा.

परीक्षणादरम्यान “ही चित्रफीत कोकणी कलाकार व इरलं संस्थेच्या राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेसाठी पाठवत आहे” असा उल्लेख करावा. स्पर्धकाने पाठवलेले परीक्षण स्वतःचेच असावे, अन्यथा स्पर्धेतून बाद करण्यात येईल. परीक्षण व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२५ अशी असेल.

स्पर्धेतील सहभागासाठी आपली व्हिडिओ चित्रफीत pustakwale@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी प्रसाद पाष्टे (८८८८९१०९९८), राहुल बेनेरे (७७९८९३७८३३), आणि सोनाली कुरतडकर (७३८७६६७९१६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button