
सख्ख्या भावांच्या वादात एकानं दुसऱ्याच्या पोटात सुरीने भोसकून त्याला जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न.
सख्ख्या भावांच्या वादात एकानं दुसऱ्याच्या पोटात सुरीने भोसकून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही भयानक घटना आज (शुक्रवार) राजापूर तालुक्यातील काजीर्डा राणेवाडी येथे घडली.या घटनेतील गंभीररित्या जखमी झालेल्या भावाला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शुक्रवारी काजीर्डा राणेवाडी येथील बाळकृष्ण आत्माराम राणे (वय 72) आणि त्यांचा सख्खा भाऊ शांताराम आत्माराम राणे (56) यांच्यात शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घरगुती कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका शिगेला पोहोचला की, बाळकृष्ण राणे यांनी त्यांच्या रागाच्या भरात सुरी सारख्या धारदार शस्त्राने आपल्या सख्ख्या भावाच्या पोटावर दोन ठिकाणी वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शांताराम राणे हे गंभीर जखमी झाले.त्यानंतर त्यांना रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र त्यांची नाजूक स्थिती लक्षात घेता अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले होते. तेथून पुढे त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.