
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली.शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दहा राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांचे वृत्त जारी करण्यात आले.राष्ट्रपती भवनाकडून याविषयी परिपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्यानुसार संबंधित नेत्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून या नियुक्त्या लागू होतील. राधाकृष्णन सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी संतोषकुमार गंगवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येईल.तमिळनाडूचे ६७ वर्षीय राधाकृष्णन भाजपचे नेते आहेत. त्यांचा जन्म चार मे १९५७ रोजी तिरुपूरमध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी त्यांनी कार्य सुरु केले. ते कोइमतूर मतदारसंघातून लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते. भाजपचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २००४ ते २००७ या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूची सूत्रे होती. या कालावधीत त्यांनी सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत रथयात्रा काढली होती. नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता आणि दहशतवादाला विरोध यासाठी त्यांनी आवाज उठविला होता.आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेत देशाचे प्रतिनिधित्व केले.राधाकृष्णन हे गेल्या पाच वर्षांतील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत. रमेश बैस यांची गेल्या वर्षी १८ फेब्रुवारी रोजी नियुक्ती झाली होती. त्याआधी भगतसिंह कोश्यारी यांनी ५ सप्टेंबर २०१९ ते १७ फेब्रुवारी २०२३ अशा सुमारे साडे तीन वर्षांच्या कालावधीत हे पद भूषविले. त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे एकूण २४वे राज्यपाल ठरले आहेत.