
आमदार रवींद्र वायकर यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाना कडून(ईडी) दहा तास चौकशी*
जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दहा तास चौकशी केली.सकाळी ११ च्या दरम्यान ते ईडीच्या बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. रात्री नऊ वाजता ते ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. जोगेश्वरी पूर्व येथील एका भूखंडावर बांधकाम होत असलेल्या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामाकरिता वायकर यांनी त्यापूर्वीचे काही करार लपविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे महानगरपालिकेत कार्यरत सबइंजिनिअर संतोष मांडवकर यांनी तक्रार दाखल केली होती. याच आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्याच्या आधारे आता ईडी तपास करत आहे. याप्रकरणी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून अलीकडेच मुंबई महानगरपालिकेने या हॉटेलच्या बांधकामाची परवानगी रद्द केली आहे. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ९ जानेवारी रोजी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब, तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशी एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती.www.konkantoday.com



