
गुहागर तालुक्यातील परचुरी आणि दापोली तालुक्याला फेरीबोटीची सोमवारी यशस्वी चाचणी
गुहागर तालुक्यातील परचुरी आणि दापोली तालुक्याला फेरीबोटीची सोमवारी यशस्वी चाचणी झाली. यावेळी या फेरीबोटीचे सर्वेसर्वा डॉ. चंद्रकांत मोकल हे उपस्थित होते. या फेरीबोटीमुळे गुहागर-दापोली हे तालुके जोडले जाणार असून तालुक्यातील प्रवासी वर्गाला मुंबई अंतरदेखील कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. दिवाळी सणापासून ही फेरीबोट सेवा प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
डॉ. चंद्रकांत मोकल व डॉ. योगेश मोकल यांनी यापूर्वी धोपावे-दाभोळ, जयगड-तवसाळ आदी फेरीबोट सेवा देखील सुरू केल्या असून प्रवासी वर्गाला त्या सोयीच्या ठरल्या आहेत. वेळ व खर्च याची बचत यामुळे प्रवासीवर्गाची झाली आहे. आता परचुरी-फरारे ही फेरीबोट सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा गुहागर-दापोली तालुके जोडले जाणार असून गुहागर-परचुरी (२५ कि.मी.) परचुरी-फरारे फेरीबोट मार्ग (१.५ किमी), फरारे-उन्हवरे मार्ग (५ किमी), उन्हवरे-वाकवली (२५ किमी), वाकवली-खेड (१५ किमी), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असा हा मार्ग असणार आहे. या नव्या मार्गामुळे गुहागरवासियांना मुंबई प्रवास करताना सुमारे ७० कि.मी. इतके अंतर कमी होण्याचा अंदाज आहे. www.konkantoday.com