
धाडस आले अंगाशी ,एसटी चालकाला व्हावे लागले निलंबित
महाडमधील रेवतळे येथील पुराच्या पाण्याखाली गेलेल्या पुलावरून बस चालवल्याप्रकरणी एसटी चालकाला मंगळवारी निलंबित करण्यात आले. विजयकुमार जाधव असे चालकाचे नाव आहे.
पिंपरी-चिंचवड आगारातून सोमवारी ही बस ५२ प्रवाशांसह वेळासकडे जात होती. दुपारी सव्वातीनच्या सुमारास बस महाड स्थानकातून वेळासकडे मार्गस्थ झाली. ही बस पावणेचार वाजता रेवतळे गावाजवळील छोटय़ा पुलाजवळ आली. त्यावेळी मुसळधार पावसामुळे या पुलावरून दोन-तीन फुटांवर पाणी वाहत होते. कठडे नसलेल्या या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेगही जास्त होता. मात्र, चालक विजयकुमार यांनी पाण्यातून बस चालवली. पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर काही क्षण गांगरल्याने त्यांनी बस मध्यभागी थांबवली.मात्र, ती पुन्हा पुढे नेली.
ही बस मंडणगड येथे पोहोचल्यानंतर प्रवाशांनी स्थानकात याबाबत तक्रार केली. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केला. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांद्वारे सर्वत्र पसरली. अखेर या घटनेची गंभीर दखल घेत विजयकुमार यांना निलंबित करण्यात आले.
