खेड येथील डेंटल कॉलेज ते एसटी डेपो दरम्यानच्या रस्त्याची २ महिन्यात दुरवस्था; ८० लाखाचा शासकीय निधी खर्च केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी

खेड : डेंटल कॉलेज ते एसटी डेपो दरम्यानच्या रस्त्यावर ८० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला मात्र केवळ दोन महिन्यातच हा रास्ता पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खर्च केलेला निधी पाण्यात गेला आहे. रस्त्यावर खर्च झालेला हा निधी जनतेच्या घामाचा असल्याने या रस्त्याच्या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपने एका निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डेंटल कॉलेज ते खेड एसटी डेपो हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र काहीं वर्षांपूर्वी हा रस्ता नगरपालिका प्रशासनाने तो आपल्याकडे वर्ग करून घेतला. तिथपासून दरवर्षी या रस्त्यावर नगरपालिका खर्च करतच आहे. मध्यंतरी महावितरणची भूमिगत केबल टाकण्यासाठी या रस्त्याची खोदाई करण्यात आली. या दरम्यान रस्त्यावर पडलेले खड्डे वेळेत न बुजविले गेल्याने एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर काही सामाजिक संस्थांनी मोर्चे काढून निषेध व्यक्त केल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर मलमपट्टी करण्यात आली होती.
पावसाळ्यापूर्वी या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल ८० लाखांची निविदा काढण्यात आली. मात्र पहिल्या पावसातच रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्यावर खर्च केलेला ८० लाखांचा निधी पाण्यात गेला. याच रस्त्यावर शासकीय निधीतून स्पीड ब्रेकर्स टाकण्यात आले होते. यासाठी देखील शासकीय निधी खर्च करण्यात आला मात्र महिन्याभरातच लाखो रुपये खर्च करून टाकण्यात आलेले स्पीड ब्रेकर्स उखडून गटारामध्ये गेले.
डेंटल कॉलेज ते खेड एसटी डेपो हा शहरातील मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर वाहने आणि पादचाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. पंचायत समिती, पोलीस स्थानक, तहसीलदार कार्यालय, न्यायालय देखील याच मार्गावर असल्याने हा मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. त्याच रस्त्याची आता चालता न येण्यासारखी दुरवस्था झाली असल्याने या रस्त्यावर खर्च करण्यात आलेला ८० लाख रुपयांचा निधी नक्की कुठे गेला? या प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जो प्रयन्त या संपूर्ण कामाच्या दर्जाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तो प्रयन्त डांबरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
www.konkantody.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button