जिल्हा रूग्णालयातील रामरोटीचा उपक्रम सामान्यांना फायदेशीर 

रत्नागिरी ः रत्नागिरी शासकीय रूग्णालयात गावागावातून आलेल्या रूग्णांना आजच्या महागाईच्या जमान्यात अवघ्या १० रुपयांत पोळी भाजी देण्याचा रत्नागिरीतील शिवप्रसाद महाजनी फाऊंडेशनचा रामरोटी या नावाने केलेला उपक्रम लोकप्रिय ठरत असून सामान्यांचा आधार ठरलेल्या या उपक्रमाचा ५० हजारांहून अधिक जणांनी लाभ घेतला आहे. शासकीय रूग्णालयात रूग्णाला दाखल केल्यानंतर अनेकवेळा रूग्णांचे नातेवाईक त्यांचेबरोबर असतात. या नातेवाईकांना रहावे लागल्यामुळे बाहेर जेवणाचा खर्च परवडत नाही. यासाठी महाजन फाऊंडेशनच्यावतीने रामरोटी उपक्रम सुरू करण्यात आला असून एका थाळीत ३ पोळ्या आणि भाजी केवळ १० रुपये अशा नाममात्र किंमतीत उपलब्ध करून दिले जाते. ३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाला खंड पडलेला नाही. सुट्टी किंवा राष्ट्रीय सणालादेखील ही सेवा सुरळीत सुरू ठेवली आहे. त्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांना एक आधारच निर्माण झाला आहे. रत्नागिरीतील मैत्री ग्रुपचे कौस्तुभ सावंत व सुहास ठाकुरदेसाई हे या उपक्रमासाठी पोळीभाजीचा पुरवठा करीत आहेत. रत्नागिरीतील प्रसिद्ध वकील ऍड. शिवप्रसाद महाजनी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी ऍड. रूची महाजनी यांनी पुढाकार घेवून फौंडेशनमार्फत या उपक्रमाबरोबरच रूग्णांसाठी लागणारी उपकरणे भाडे तत्वावर देणे आदी समाजोपयोगी उपक्रम सुरू ठेवले आहेत.

Related Articles

Back to top button