चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे दुर्मिळ खवले मांजराच्या पिल्लाला जीवदान; वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे वाचला १ वर्षीय मादी पिल्लाचा जीव लोकवस्तीत वन्यजीव आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

रत्नागिरी, दि. २८ ) : चिपळूण तालुक्यातील मौजे खेरशेत (बौद्धवाडी) येथील लोकवस्तीत आलेल्या दुर्मिळ जातीच्या खवले मांजराच्या पिल्लाला वन विभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या रेस्क्यू करून जीवदान दिले. पशुवैद्यकीय तपासणीनंतर या पिल्लाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
खेरशेत (बौद्धवाडी) येथील प्रताप अविनाश मोहिते यांच्या घराच्या अंगणात आज खवले मांजराचे पिल्लू आल्याचे निदर्शनास आले. याबाबत खेरशेत येथील स्थानिक नागरिक स्वप्निल कदम यांनी तात्काळ नांदगावच्या वनरक्षकांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांना याबाबत कळवण्यात आले.
त्यानुसार चिपळूणचे परिक्षेत्र वन अधिकारी एस. एस. खान, नांदगाव वनरक्षक कु. अश्विनी जाधव, रामपूर वनरक्षक राहुल गुंठे आणि जलद कृती दलाचे (RRT) सदस्य रितेश घाग व मयूर सकपाळ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पथकाने अत्यंत कौशल्याने या पिल्लाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. रेस्क्यू करण्यात आलेले हे खवले मांजर मादी जातीचे असून त्याचे वय अंदाजे एक वर्ष आहे.
ताब्यात घेतल्यानंतर सावर्डे येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून या खवले मांजराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पिल्लू पूर्णपणे सुस्थितीत व निरोगी असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिल्यानंतर, वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यास नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून देण्यात आले.
ही संपूर्ण बचाव मोहीम रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
वन विभागाचे नागरिकांना आवाहन
वन्यजीव हे निसर्गाच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लोकवस्तीत कोणताही वन्यप्राणी आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्यांना स्वतः पकडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, तर तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button