
रत्नागिरीत लक्ष्मी चौक ते तेलीआळी रस्ता रुंदीकरणा; ३१ जणांना पालिकेच्या नोटिसा
रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष्मी चौक ते तेलीआळी या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली असून, रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण केलेल्या ३१ जणांना नगर परिषदेने नोटिसा बजावल्या आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर नगर परिषदेच्या नगररचना विभागाने रुंदीकरणाच्या प्रक्रियेला गती दिली. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे बाजारपेठेतील अरुंद रस्ते वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे हा रस्ता रुंद झाल्यास बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
मात्र, रुंदीकरणाच्या निर्णयामुळे या मार्गावरील व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक व्यावसायिकांनी कर्ज काढून दुकानांचा विस्तार केला असून, बांधकामासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे. रुंदीकरण झाल्यास काही दुकानांचा मोठा भाग, तर काहींच्या दुकानांचा निम्म्यापर्यंतचा भाग बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईबाबत व्यापाऱ्यांमध्ये अंतर्गत नाराजी आणि विरोध असल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप एकाही संबंधित व्यापाऱ्याने नगर परिषदेकडे लेखी तक्रार दाखल केलेली नाही. पालिकेकडे एकही लेखी तक्रार प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे नोटिसा बजावल्यानंतर नगररचना विभागाकडून पुढील कोणती कार्यवाही केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार दशकांपासून चर्चेत असलेला बाजारपेठेतील अरुंद रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागल्यास शहराच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र, रस्ता रुंदीकरण करताना व्यापाऱ्यांची आर्थिक गुंतवणूक, व्यवसायाचे हित आणि शहराच्या भविष्यातील विकासाची गरज यांचा समतोल राखण्याचे आव्हान नगर परिषदेसमोर असणार आहे.




