
चिपळूणच्या पूरमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; वाशिष्ठी नदीवरील २० कोटींच्या कामाला सुरुवात!
आमदार शेखर निकम यांच्या हस्ते वांगडे मोहल्ला येथे भूमिपूजन; जलसंपदा विभागामार्फत पूर प्रतिबंधक उपाययोजना
चिपळूण : वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे दरवर्षी होणाऱ्या नुकसानीतून चिपळूणकरांची सुटका करण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. वांगडे मोहल्ला येथे २० कोटी रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या पूर प्रतिबंधक कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे.
चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीच्या पुराचा प्रश्न अनेक वर्षांपासून सतावत आहे. अतिवृष्टीच्या काळात नदीची पाणीपातळी वाढल्याने बाजारपेठेसह शहरातील सखल भागांमध्ये पाणी शिरते. यामुळे व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पूर प्रतिबंधक कामासाठी २० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. यापूर्वी नलावडा बंधाऱ्यावर संरक्षक भिंत बांधल्यामुळे त्या परिसराला पुराच्या पाण्यापासून संरक्षण मिळण्यास मदत झाली होती. आता वांगडे मोहल्ला येथील कामामुळे शहराच्या पूरप्रश्नावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे.
या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निकम यांनी महायुती सरकारचे आभार मानले. स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री उदय सामंत यांचेही त्यांनी आभार मानले.
यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, भाजप गटनेते शशिकांत मोदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते विकी नरळकर, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, आरोग्य समिती सभापती शुभम पिसे, योगेश पवार, संदीप भिसे, संजय गोताड, शैनाज वांगडे, उमा देसाई, राणी महाडिक, आदिती देशपांडे, खालिद दाभोलकर, विनोद पिल्ले, इम्रान कोंडकरी, जहिर कुंडलिक, असिफ कुंडलिक, इम्रान खतीब, हिंदुराव पवार, राम नलावडे, सुरेश माने, गणपत काळे, सर्जेराव कलकूटकी, अस्लम वांगडे, बरकत वांगडे, सिराज वांगडे आदी उपस्थित होते.




