
गोवळकोट परिसरातील मचूळ पाण्याच्या प्रश्नावर तोडग्याच्या दिशेने मोठे पाऊल!
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या प्रयत्नांना यश; गोवळकोट रोड, पेठमाप, मुरादपूर, शंकरवाडीत गोड्या पाण्याचा पुरवठा सुरू
चिपळूण : चिपळूण शहरातील गोवळकोट परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या मचूळ पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने नगरपरिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या पुढाकारातून गोवळकोट रोड, पेठमाप, मुरादपूर आणि शंकरवाडी परिसरातील नागरिकांना गोड्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला असल्याची माहिती नगरसेवक उदय जुवळे यांनी दिली.
खाडीच्या बॅकवॉटरमुळे या परिसरातील पाण्याच्या स्रोतांमध्ये खारेपणा आणि मचूळपणा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नासाठी यापूर्वी अनेक आंदोलने आणि निवेदने देण्यात आली होती.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेटी देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नगरसेवक उदय जुवळे आणि नगरसेविका मिसबा नाखुदा यांनीही यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही भागांतील पाणीप्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, गोवळकोट गावातील काही भागांत अद्याप मचूळ पाण्याची समस्या कायम असून उर्वरित भागांनाही गोडे पाणी मिळावे यासाठी नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे आणि नगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच संपूर्ण परिसराचा पाणीप्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास नगरसेवक उदय जुवळे यांनी व्यक्त केला.




