
संसदेचे विशेष अधिवेशन; मतदारसंघ फेररचनेचे घटनादुरुस्ती विधेयक नव्याने मांडणार?
नवी दिल्ली : महिला आरक्षणासह मतदारसंघ फेररचना घटनादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत पराभव पत्कारावा लागल्यानंतर आठ महिन्यांतच केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेतचे कामकाज ३० नोव्हेंबरला तर, राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरला सुरू होईल. या अधिवेशनात कोणते विशिष्ट कामकाज वा विधेयके मांडली जातील हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी महिला आरक्षणाशी जोडलेले लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेचे घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा मांडले जाण्याची दाट शक्यता आहे.
केंद्र सरकारने अधिवेशन संस्थगित होऊन शंभराहून जास्त दिवस झाले तरी पावसाळी अधिवेशनाची समाप्ती केली नसल्याने ‘विशेष अधिवेशन’ बोलावले जाऊ शकते, असा कयास गेल्या दोन आठवड्यापासून केला जात होता. शिवाय, घटनादुरुस्ती विधेयकासाठी ‘विशेष अधिवेशन’ घेतले जाईल, असे केंद्र सरकारमधील सूत्रांची सूचित केले होते. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी ‘एक्स’वर सरकारी कामकाज पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले जात आहे, अशी घोषणा केली.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्ट रोजी संस्थगित करण्यात आले होते. मात्र या अधिवेशनाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाप्तीची घोषणा केली नव्हती. त्यामुळे पुढील आठवड्यात सोमवारी सुरू होणारे चार दिवसांच्या कालावधीचे अधिवेशन पावसाळी अधिवेशनाचा भाग असेल. वास्तविक, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होते. मात्र यावेळी पावसाळी अधिवेशनच पुनस्र्थापित करण्यात आले आहे. घटनादुरुस्ती विधेयकामध्ये प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा वाढवण्याची हमी केंद्र सरकारने द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती.
ही मागणी मान्य करून नव्या विधेयकात तरतूद केली तर विधेयक मंजुरीचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. लोकसभेमध्ये विधेयक मंजुरीसाठी ३६० सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, द्रमुक, अकाली दल, वायएसआर काँग्रेस आदी पक्षांनी पाठिंबा दिला तर केंद्र सरकारकडे ३५४चे संख्याबळ असेल. आणखी ६ सदस्यांची पाठिंब्याची गरज भासत असली तरी विरोधी पक्षांच्या सहमतीने हे विधेयक संमत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या विधेयकाविरोधातील काँग्रेसची भूमिका अजूनही कायम आहे.
संख्याबळासाठी जुळवाजुळव
- गेल्या तीन महिन्यांमध्ये केंद्र सरकारकडून घटनादुरुस्ती विधेयकासाठी दोन तृतीयांश संख्याबळाची जमवाजमव करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
- विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांची मनधरणी केली जात होती. ‘इंडिया’ आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व द्रमुक या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्यात आला होता. या दोन्ही पक्षांनी दुरुस्तीसह आणल्या जाऊ शकणार्या विधेयकला विरोध दर्शवलेला नाही.
- याशिवाय आप, राष्ट्रीय जनता दल आदी विरोधी पक्षानी मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला तर केंद्र सरकारकडे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी पुरेसे संख्याबळ जमवता येऊ शकते, असे मानले जात आहे.
द्रमुक अनुकूल?
तमिळनाडूमध्ये सध्या सत्तेबाहेर असलेल्या द्रमुक पक्षाला प्रत्येक मुद्द्यावर भाजपला तीव्र विरोध करण्याची गरज नाही. जर तमिळनाडूचा लोकसभेतील सध्याचा सुमारे ७.२ टक्के जागांचा वाटा कायम राखला जाणार असेल, तर पक्ष विधेयकाचे समर्थन करेल, असे पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. तामिळनाडूचा सध्याचा प्रतिनिधित्वाचा वाटा अबाधित राहिल्यास, लोकसभेच्या जागा वाढवण्यास अनुकूल भूमिका असल्याचे या नेत्यांनी सांगितले.




