
गोड्या पाण्याच्या प्रश्नावरून चिपळूण नगरपालिकेसमोर उपोषणस्थळी गोंधळ; नगराध्यक्ष सकपाळ आणि नगरसेवक सरगुरोह यांच्यात खडाजंगी!
महाविकास आघाडीच्या उपोषणस्थळी जोरदार शाब्दिक चकमक; ‘मी शहराचा नगराध्यक्ष आहे, कोणत्याही पक्षाचा नाही’, उमेश सकपाळ यांची भूमिका

चिपळूण : चिपळूण शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड परिसरातील नागरिकांना गोडे पाणी मिळावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणस्थळी बुधवारी चांगलाच गोंधळ निर्माण झाला. उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष उमेश सकपाळ तेथे दाखल झाले असता काँग्रेसचे नगरसेवक तथा उपोषणाचे नेतृत्व करणारे साजिद सरगुरोह आणि नगराध्यक्ष सकपाळ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. सरकारच्या निषेधावरून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर खडाजंगीत झाले.
चिपळूण शहरातील काही भागांना गेल्या अनेक वर्षांपासून मचूळ आणि खारट पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या प्रश्नावर महाविकास आघाडीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणस्थळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी साजिद सरगुरोह यांनी महायुती सरकारचा निषेध केल्याने नगराध्यक्ष सकपाळ आक्रमक झाले. त्यातून दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
यावेळी ‘मी शहराचा नगराध्यक्ष आहे, कोणत्याही पक्षाचा नाही,’ अशी भूमिका उमेश सकपाळ यांनी मांडली. मचूळ पाणीपुरवठा ही नैसर्गिक समस्या असल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नावर आपली बाजू स्पष्ट केली. तसेच, ‘नगरसेवक साजिद सरगुरोह सकाळी ११ वाजेपर्यंत झोपून राहतात. मी रात्री एक वाजेपर्यंत पाणीपुरवठ्याची पाहणी करतो आणि सकाळी सहा वाजता बाहेर पडतो,’ असा टोला त्यांनी लगावला. कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी दिला. पंधरा वर्षे काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना हा प्रश्न का सुटला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यावर साजिद सरगुरोह यांनीही प्रत्युत्तर देताना, ‘आम्ही सकाळी झोपा काढतो हे तुम्ही बघायला येता का?’ असा सवाल केला. त्यामुळे उपोषणस्थळी काही काळ वातावरण चांगलेच तापले.
शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, या प्रश्नावर चुकीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिला.
गोड्या पाण्याच्या मूलभूत प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सुरू झालेल्या उपोषणस्थळीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या या शाब्दिक संघर्षामुळे चिपळूणच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आता या पाणीप्रश्नावर प्रशासन आणि नगरपरिषद कोणती ठोस भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




