अंजणारी पुलावरील अपघातांविरोधात उद्धव ठाकरे सेना आक्रमक

अपघात रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी; अंजणारी येथे रस्ता रोको आंदोलन

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाच्या परिसरात वारंवार होत असलेल्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी पक्षाच्या वतीने अंजणारी येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंजणारी पुलाच्या आधी असलेल्या अवघड वळणामुळे गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अनेक भीषण अपघातांमध्ये काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच महामार्ग विभागाचे अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते.

अंजणारी पुलाच्या परिसरातील अपघातप्रवण ठिकाणाची तातडीने पाहणी करून वेगनियंत्रण, आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाय, दिशादर्शक फलक आणि इतर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. प्रशासनाने केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता या मार्गावरील अपघातांना कायमचा आळा बसेल, अशा ठोस उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button