
मतिमंद तरुणीवरील अत्याचारप्रकरणी दोघांना अटक; तिसरा आरोपी अल्पवयीन,राजापूर तालुक्यात खळबळ,
*राजापूर तालुक्यात २२ वर्षीय दिव्यांग तरुणीवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन प्रौढ आरोपींना राजापूर पोलिसांनी अटक केली आहे. तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीत पीडिता दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ बसान्ना गंगाशेट्टी (वय ४७, मूळ रा. वडावगी, विजापूर, कर्नाटक, सध्या रा. हातिवले, राजापूर) आणि वैभव विलास राऊत (वय २६, रा. आंगले, राजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अल्पवयीन असून, तो पीडित तरुणीच्या नातेसंबंधातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी या तिघांनी अत्याचार केल्याचे पीडितेच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडित तरुणी आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली असताना तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे समोर आले.
यानंतर मानसोपचार तज्ज्ञांसमक्ष नोंदविण्यात आलेल्या जबाबात तरुणीने आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार राजापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही प्रौढ आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन आरोपीच्या पालकांना पोलिसांनी नोटीस बजावली असून, त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या गंभीर घटनेमुळे राजापूर तालुक्यात संताप व्यक्त होत असून, संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.




