
गणपतीपुळे ते पणजी (गोवा) नवीन बससेवा १५ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू
रत्नागिरी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली गणपतीपुळे ते पणजी (गोवा) नवीन बससेवा १५ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. गोवा राज्य परिवहन महामंडळातर्फे (कदंबा) ही बस चालवली जात असून, या थेट सेवेमुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
रत्नागिरीमधून थेट पणजी येथे जाण्यासाठी यापूर्वी पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बस बदलत नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता ही नवीन बस सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः गणपतीपुळे आणि गोवा ही दोन्ही प्रसिद्ध पर्यटन स्थळे या बससेवेमुळे जोडली गेल्यामुळे कोकणातील पर्यटनाला अधिक मोठी चालना मिळणार आहे.
कदंबा महामंडळाची ही बस गणपतीपुळे येथून सुटून गणपतीपुळे – रत्नागिरी – पावस – आडिवरे – धारतळे – राजापूर – कणकवली – कुडाळ – सावंतवाडी – म्हापसा या मार्गाने पणजीकडे रवाना होईल.
गाडीचे वेळापत्रक असे असेल : गणपतीपुळे ते पणजी – गणपतीपुळे: सकाळी ०७:१५ वाजता, रत्नागिरी: सकाळी ०८:३० वाजता, पावस: सकाळी ०९:०० वाजता, आडिवरे: सकाळी ०९:४० वाजता, धारतळे: सकाळी ०९:५० वाजता, राजापूर: सकाळी १०:३० वाजता
पणजी ते गणपतीपुळे – पणजी बसस्थानक: दुपारी ०१:३० वाजता,
रत्नागिरी, राजापूर आणि कोकणातील सर्व प्रवासी वर्गाने या नवीन बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन गोवा राज्य परिवहन महामंडळाच्या (कदंबा) वतीने करण्यात आले आहे.




