
चांदोर (उगवतीवाडी) शाळेला युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी तालुक्याच्या वतीने ‘कलर प्रिंटर’ भेट; शैक्षणिक सक्षमीकरणाचा युवासेनेचा उपक्रम उत्साहात संपन्न

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि शाळेचे दैनंदिन कामकाज अधिक गतिमान व्हावे, या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना रत्नागिरी तालुका यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा चांदोर नं. ४, उगवतीवाडी शाळेला 'कलर प्रिंटर' भेट देण्यात आला. सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता हा वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
सध्याच्या डिजिटल आणि स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील शाळांसाठी कलर प्रिंटर अत्यंत उपयुक्त साधन ठरत आहे. विद्यार्थ्यांना रंगीत शैक्षणिक तक्ते, चित्ररूप अभ्यास साहित्य, प्रकल्प अहवाल तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका शाळेतच त्वरित उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे. याशिवाय शालेय प्रशासकीय कामकाजासाठी बाहेर जाण्याचा वेळ आणि खर्च वाचणार असून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळणार आहे.
युवासेना रत्नागिरी तालुक्याच्या वतीने गेल्या काही काळापासून शैक्षणिक क्षेत्रातील या गरजा ओळखून सातत्याने समाजोपयोगी कार्य केले जात आहे. यापूर्वी देखील युवासेनेच्या वतीने काळबादेवी आणि खेडशी येथील शाळांना प्रिंटर देऊन त्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण करण्यात आले आहे. केवळ शैक्षणिक साहित्यच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून युवासेनेने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्याच शृंखलेतील हा पुढचा टप्पा चांदोर येथे यशस्वीरित्या पूर्ण झाला.
नुकत्याच निवड झालेल्या नवनिर्वाचित उपविभाग अधिकारी आणि युवासेना शाखा अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील हा पहिलाच सामाजिक व शैक्षणिक उपक्रम ठरला. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे युवासेना रत्नागिरी तालुका अधिकारी श्री. संदेश नारगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि युवासेना शाखा चांदोर यांच्या हस्ते तसेच गोळप पंचायत समिती गणाचे उपविभाग अधिकारी श्री. योगेश पड्यार, चांदोर उपसरपंच श्री. सुर्यकांत तांबे, युवासेना शाखा अधिकारी श्री. सुहास गुळेकर यांच्या सहभागाने हा कलर प्रिंटर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. आसावरी तांबे, मुख्याध्यापक श्री. राजीव आंबेकर सर आणि शाळेतील विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
या सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. विनोद शिंदे, गटप्रमुख श्री. शशिकांत तांबे, श्री. संजय करसोडे, श्री. संजय गुळेकर, अंगणवाडी सेविका सौ. कविता गोताड मॅडम तसेच शिक्षकवृंद आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच उपक्रमात शाळेच्या अत्यंत गरजेची वस्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. राजीव आंबेकर सर, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी युवासेना रत्नागिरी तालुका, युवासेना शाखा चांदोर व सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत मनःपूर्वक आभार मानले.




