रत्नागिरीच्या ‘जागर’ लघुपटाची राष्ट्रीय महोत्सवासाठी निवड!

मिलिंद कांबळे यांच्या कलाकृतीची शिवप्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव २०२६ मध्ये निवड


सामाजिक आणि समकालीन विषयांवर भाष्य करणाऱ्या रत्नागिरीच्या ‘जागर’ या मराठी लघुपटाने राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार आणि निर्माता मिलिंद रघुनाथ कांबळे यांच्या या लघुपटाची अखिल भारतीय चित्रपट संघटनेच्या शिवप्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव २०२६ साठी अधिकृत निवड झाली आहे. या निवडीमुळे रत्नागिरीच्या कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २ ऑगस्ट २०२६ रोजी या लघुपट स्पर्धेची घोषणा केली होती. यावेळी आमदार बच्चू कडू आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर आधारित लघुपट निर्मितीसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांचे प्रश्न, आरोग्यनाथ, सामान्य माणसापासून मुख्यमंत्री पदापर्यंत एकनाथ शिंदे यांचा प्रवास तसेच उठाव का आणि कशासाठी, अशा सहा विषयांवर लघुपट सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १७० हून अधिक लघुचित्रपट प्राप्त झाले होते.

या स्पर्धेत रत्नागिरीच्या मिलिंद कांबळे यांच्या ‘जागर’ या लघुपटाची अधिकृत निवड होणे ही जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कलावंतांच्या सर्जनशीलतेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळत असल्याने या निवडीचे विशेष महत्त्व आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button