
महायुतीची सत्ता येताच गोकुळचा मोठा निर्णय! दूध दरात केली ऐतिहासिक वाढ, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री?
राज्यभरात गोकुळनिवडणुकीवरून मोठ्या प्रमाण चर्चा रंगल्या होत्या. गोकुळवर शासननियुक्त चार संचालकांची नियुक्ती झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.शासननियुक्त संचालकांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे महायुतीचा अध्यक्ष निवडून आला. अश्यातच आता मोठी बातमी समोर येत आहे.
महायुतीच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाच्या नव्या संचालक मंडळाची सूत्रे हाती आल्यानंतर पहिल्याच बैठकीत दूध दरवाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर ६ रुपयांची वाढ केली आहे. तर गाईच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरातही प्रत्येकी २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे.
गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत म्हशीच्या दूध दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. म्हशीच्या दूध विक्री दरात ६ रुपये, तर दूध खरेदी दरात ३ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रत्येक लिटरमागे तीन रुपये अधिक मिळणार आहेत. दुसरीकडे गाईच्या दूध खरेदी दरात २ रुपये आणि विक्री दरातही २ रुपये वाढ करण्यात आली आहे. नवीन दर शनिवारपासून लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.गोकुळ दूध संघावर सुमारे ७० कोटी रुपयांची तूट असल्याचे सांगितले जात आहे. ही आर्थिक तूट भरून काढण्यासोबतच दूध उत्पादकांना वाढीव दर देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.




