
रत्नागिरीत दस्त नोंदणीसाठी आणखी एक दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी
रत्नागिरी : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी साठी वकिलांना येणाऱ्या अडचणी संदर्भात रत्नागिरी बार असोसिएशनच्या पदाधिकारी, वकील यांनी आज रत्नागिरीचे सह दुय्यम निबंधक अधिकारी श्री. खेडसकर यांची भेट घेऊन, दस्त नोंदणीची कामे सुरळीत कशी होतील यादृष्टीने पावले उचलावीत असे सूचित केले.
याबाबत येत्या काही दिवसांत रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेऊन रत्नागिरीमध्ये आणखी एक कार्यालय सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे. गेले काही महिने दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदवण्यासाठी अनेक अडचणी वकील वर्गाला येत आहेत. बुकिंग स्लॉटची संख्या आधार व्हेरिफिकेशन मुळे ४३ वरून ३० वर आणण्यात आली. तिथून ही समस्या निर्माण झाली असून, सद्यस्थितीत दस्त नोंदवण्यासाठी अनेकांना बुकींग स्लॉट उपलब्ध होत नाहीत. परिणामी दस्त नोंदवण्याकामी अडचण निर्माण झाली आहे.
याबाबत मार्ग काढण्यासाठी आज रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत या विचार विनिमय करण्यात आला. त्यावेळी रत्नागिरीत आणखी एक कार्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना पत्र देण्यात यावे असे ठरविण्यात आले.
या बैठकीनंतर रत्नागिरी बार असोसिएशनच्या पदाधिकारी, वकील यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन श्री. खेडसकर यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून दस्त नोंदणीची प्रक्रिया योग्य पद्धतीने कशी होईल याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे सूचित केले.




