२०१४ ते २०२६ या काळात ९९ हजार हेक्टरहून अधिक जंगलक्षेत्रावर घाला’; पर्यावरणाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका!

देशातील पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. २०१४ ते २०२६ या काळात देशातील संरक्षित क्षेत्रं, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रं आणि वन्यजीवांच्या भ्रमणमार्गांमधील किमान ९९ हजार हेक्टरहून अधिक जमिनीचा वापर खाणकाम, धरणं, महामार्ग आणि अन्य प्रकल्पांसाठी करण्यास मंजुरी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘वन्यजीवांचं संरक्षण करणाऱ्या संस्थेकडूनच त्यांच्या अधिवासावर घाला’

वन्यजीवांचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेकडूनच अशा प्रकल्पांना मंजुरी दिली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती शेअर केली. संरक्षित क्षेत्रं, पर्यावरण संवेदनशील भाग आणि वन्यजीव मार्गांमधील मोठ्या भूभागावर विकासकामांच्या नावाखाली परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘गेल्या दशकात झालेलं पर्यावरणाचं नुकसान अभूतपूर्व’

आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणांवरही टीका केली. ‘गेल्या दशकात या सरकारने ज्या प्रकारे पर्यावरणाची हानी केली आहे, तसं जगाने यापूर्वी पाहिलेलं नाही,’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या निर्णयांमुळे केवळ पृथ्वीच्या पर्यावरणालाच धोका निर्माण होत नाही, तर भारतालाही मोठा धोका असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशाची लोकसंख्या, जैवविविधता आणि अर्थव्यवस्था लक्षात घेता पर्यावरणाचं नुकसान दीर्घकालीन परिणाम घडवू शकतं, असा इशाराही त्यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय करारांचं उल्लंघन झाल्याचा आरोप

भारताने विविध आंतरराष्ट्रीय करार आणि पर्यावरणविषयक समझोत्यांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे या करारांमधील बांधिलकीचं उल्लंघन होत असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पर्यावरण संरक्षण आणि विकास प्रकल्प यांच्यात समतोल राखण्याची गरज असल्याचं त्यांच्या पोस्टमधून अधोरेखित होतं.

फ्लोटिंग होर्डिंग्ज उभारण्याच्या प्रस्तावावरूनही भाजपा सरकारवर टीका

मुंबईच्या समुद्रात १० ठिकाणी १५ फ्लोटिंग होर्डिंग्ज उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आल्याचा दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’द्वारे केला होता. यापूर्वी विरोध केल्यानंतर सरकारने केवळ दोन होर्डिंग्ज उभारण्याचे आश्वासन दिले होते, मग आता १५ होर्डिंग्जसाठी निविदा का काढल्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. ‘भाजपाला महाराष्ट्रातून पैसे उकळायचे आहेत,’ असा आरोप करत या प्रकल्पामुळे मुंबईच्या समुद्राचे सौंदर्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button