
आमदार किरण सामंत यांच्या पुढाकाराने वनगुळे धनगरवाडी रस्त्याचा प्रश्न मार्गी
वनगुळे मुख्य रस्ता ते धनगरवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ; अनेक वर्षांची ग्रामस्थांची प्रतीक्षा संपणार
लांजा : लांजा तालुक्यातील वनगुळे धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या पुढाकारातून वनगुळे मुख्य रस्ता ते धनगरवाडी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
वनगुळे धनगरवाडीतील ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, दळणवळण तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. पावसाळ्यात तर या अडचणी अधिकच गंभीर बनत होत्या. त्यामुळे धनगरवाडीला जोडणारा रस्ता व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.
ग्रामस्थांची ही समस्या आणि रस्त्याची आवश्यकता लक्षात घेऊन आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी पुढाकार घेत संबंधित कामासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने अखेर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी आमदार सामंत यांचे आभार मानले.
यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील ऊर्फ राजू कुरूप, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, तालुका संघटक प्रसाद माने, उपतालुका संघटक चेतन खंदारे, सुजित आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य लीला घडशी, पंचायत समिती सदस्य रसिका मेस्त्री, संतोष साटले, माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत, सरपंच प्रभाकर गुरव, चंद्रकांत गोठणकर, बाबा भिंगार्डे यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




