
विधवा प्रथांच्या निर्मूलनासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद सरसावली; गावागावांत जनजागृती मोहीम राबविणार!
रत्नागिरी : पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या कुंकू पुसणे, मंगळसूत्र काढणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे यांसारख्या अनिष्ट विधवा प्रथांच्या निर्मूलनासाठी आता रत्नागिरी जिल्हा परिषद पुढाकार घेणार आहे. या प्रथांविरोधात गावागावांत समाजप्रबोधन आणि जनजागृती मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. जि. प. सदस्या तथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी या सामाजिक विषयासाठी विशेष पुढाकार घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने १७ मे २०२२ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने शिवानी सावंत यांनी हा विषय स्थायी समितीसमोर मांडला. पतीच्या निधनानंतर दुःखात असलेल्या महिलांवर अशा प्रथा लादल्या जाणे ही सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाब असून, महिलांचा सन्मान आणि आत्मसन्मान जपण्यासाठी समाजात सकारात्मक परिवर्तन घडणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायती, ग्रामसभा, महिला बचत गट, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्तरीय कर्मचारी, सामाजिक संस्था आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सहभागातून जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामसभांमध्ये या विषयावर चर्चा घडवून आणून महिलांच्या सन्मानाबाबत सामाजिक जाणीव निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत स्त्री-पुरुष समानता, महिलांचे अधिकार आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा जागर करण्याची गरजही या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.
पतीच्या निधनानंतर महिलेच्या आयुष्यावर सामाजिक बंधनांचे ओझे लादण्याऐवजी तिच्या दुःखात कुटुंबीय आणि समाजाने आधार बनून उभे राहिले पाहिजे. विधवा प्रथांचे निर्मूलन म्हणजे केवळ एका रूढीला विरोध नसून महिलांच्या स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा स्वीकार आहे.
जिल्हा परिषदेच्या या ठरावामुळे गावागावांत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी राहण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, शिवानी सावंत यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.




