
राजापूर ते देवगडदरम्यान अपरिचित प्राचीन वारसास्थळांचा शोध!
'लेणी संवाद'चे प्रफुल्ल पुरळकर यांचा तीन दिवसीय अभ्यास दौरा; ९ एकाश्म लेणी, ३ कातळशिल्पांसह ऐतिहासिक स्थळांची पाहणी

राजापूर : कोकणातील अपरिचित प्राचीन वारसास्थळांचा शोध घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्यांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व समाजासमोर आणण्याच्या उद्देशाने ‘लेणी संवाद’चे प्रफुल्ल पुरळकर यांनी ९ ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राजापूर ते देवगड असा तीन दिवसीय अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात एकूण ९ एकाश्म लेणी, ३ कातळशिल्पे तसेच काही ऐतिहासिक स्थळांची पाहणी करून त्यांची माहिती संकलित करण्यात आली.
या अभ्यास दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात राजापूर तालुक्यातील कोदवली, गोठणे-दोनिवडे आणि पांगरे बुद्रुक येथील एकूण आठ एकाश्म लेण्यांची पाहणी करण्यात आली. यापैकी कोदवली आणि गोठणे-दोनिवडे येथील लेण्यांवर पत्रकार व संशोधक विनोद पवार यांनी, तर पांगरे बुद्रुक येथील लेण्यांवर प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी यापूर्वी संशोधन केले आहे. याशिवाय चुना कोळवण येथील सवतकडा धबधबा आणि कोदवली येथील सायबाचे धरण या स्थळांनाही भेट देऊन पाहणी करण्यात आली.
दौऱ्याच्या पुढील टप्प्यात देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील एकाश्म लेणी तसेच पाळेकरवाडी, बापर्डे आणि पडेल येथील तीन कातळशिल्पांची पाहणी करण्यात आली. या ऐतिहासिक वारसास्थळांवर इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांनी यापूर्वी संशोधन केले आहे. त्याचबरोबर वाडा-गावठाण येथील टिपवणे परिसरातील जुन्या पाण्याच्या कुंडाची आणि अर्धवट अवस्थेत असलेल्या कोरीव कामाचीही पाहणी करण्यात आली.
या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी गुरुनाथ सावंत, सूर्यकांत साळुंखे, विशाल साळुंखे, राज साळुंखे, सुशील मणचेकर, अमित पुरळकर, रणजित हिर्लेकर, विनोद पवार, प्रवीण पवार, दीपक सागवेकर, अनंत जानस्कार, प्रकाश जानस्कार आणि अक्षय गिजम यांचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. डॉ. अंजय धनावडे आणि मोडी लिपी व प्राचीन इतिहासाचे अभ्यासक अनिल दुधाने यांचे मार्गदर्शन मिळाले.
‘लेणी संवाद’ आणि ‘एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह, महाराष्ट्र राज्य’ यांच्या माध्यमातून प्रफुल्ल पुरळकर हे महाराष्ट्रातील अपरिचित लेणी, कातळशिल्पे आणि दुर्लक्षित ऐतिहासिक वारसास्थळांचा शोध, अभ्यास व माहिती संकलनाचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यांचे मूळ गाव देवगड तालुक्यातील पुरळ असून, सध्या ते मुंबई येथे वास्तव्यास आहेत.
कोकणात अनेक प्राचीन वारसास्थळे आजही अपरिचित आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. या स्थळांचा इतिहास, स्थापत्यवैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक महत्त्व अभ्यासपूर्ण पद्धतीने समाजासमोर आणण्याची गरज आहे. या वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन व्हावे, तसेच नव्या पिढीला आपल्या ऐतिहासिक वारशाची ओळख व्हावी, यासाठी यापुढेही संशोधन, अभ्यास आणि माहिती संकलनाचे कार्य सुरू ठेवणार असल्याचा निर्धार प्रफुल्ल पुरळकर यांनी व्यक्त केला.




