जिल्ह्यातील डायलिसिस सेवा अखंडित सुरू राहणार; सेवेत खंड पडल्यास कंपनीवर कारवाईचा पालकमंत्र्यांचा इशारा

एक 'आदर्श मॉडेल' तयार करावे, जे संपूर्ण राज्यभरात स्वीकारले जाईल ; सीएसआर व डीपीसीमधून आर्थिक तरतूद


रत्नागिरी, दि. १३ ): जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देणारी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे कोणत्याही परिस्थितीत अखंडित आणि सुरळीत सुरू राहतील, अशी ठाम ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली आहे. देयके थकीत असल्याच्या कारणावरून पूर्वसूचना न देता सेवा बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित एजन्सीला पालकमंत्र्यांनी कडक शब्दांत तंबी दिली असून, सेवेत अडथळा आणल्यास थेट कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आरोग्य विभागाच्या तातडीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
आरोग्य विभागाने ‘आदर्श मॉडेल’ उभारावे
लांजा, दापोली, संगमेश्वर, कामथे आणि पाली येथील पाचही डायलिसिस युनिट्स विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) आणि सीएसआर (CSR) निधीतून तात्काळ आर्थिक तरतूद केली जाणार आहे. यापुढे बाहेरील एजन्सीवर विसंबून न राहता, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने स्वतःची ‘इन-हाऊस’ (In-house) यंत्रणा उभारावी. रत्नागिरी जिल्ह्याने असे एक ‘आदर्श मॉडेल’ तयार करावे, जे संपूर्ण राज्यभरात स्वीकारले जाईल, असे महत्त्वपूर्ण निर्देश डॉ. सामंत यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले.
निधीची तात्काळ तरतूद आणि महत्त्वाचे निर्णय
रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये यासाठी बैठकीत खालीलप्रमाणे तातडीचे निर्णय घेण्यात आले:

  • थकीत देयके: संबंधित एचएलएल (HLL) कंपनीची थकीत देयके मार्गी लावण्यासाठी आजच्या आज २४ लाख रुपये वर्ग करण्याचे आणि उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने देण्याचे निर्देश देण्यात आले.
  • औषधे व साहित्य: डायलिसिससाठी लागणारी औषधे आणि आवश्यक वैद्यकीय साहित्याचा तुटवडा भासू नये म्हणून २० लाख रुपयांची तातडीची तरतूद करण्यात आली.
    कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हावेत यासाठी सीएसआर निधीतून राखीव ठेवण्यात आले आहेत.
    रुग्णांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही
    देयके प्रलंबित असल्याचा मुद्दा पुढे करत पूर्वसूचना न देता डायलिसिससारखी अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एचएलएल (HLL) कंपनीच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी चांगलेच धारेवर धरले. “रुग्णांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. सेवा बंद केल्यास कठोर कारवाई करू,” अशा शब्दांत त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना खडेबोल सुनावले.
    या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, नगरसेवक सुहेल मुकादम उपस्थित होते, तर आरोग्य विभागाचे सहायक संचालक बसवराज लोहारे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे (VC) सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button