
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानतर्फे श्री देव भैरी मंदिरात भव्य दीपोत्सव उत्साहात संपन्न
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या रत्नागिरी विभागातर्फे रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात भव्य दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत आयोजित या दीपोत्सव सोहळ्यात गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे ३८ मावळे व रणरागिणी सहभागी झाले होते. दीपप्रज्वलनाने मंदिर परिसर उजळून निघाला असून, संपूर्ण वातावरण शिवमय आणि भक्तिमय झाले होते. परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या प्रसंगी श्री देव भैरी मंदिराचे अध्यक्ष मुन्ना सुर्वे, धनंजय कदम, बावा शिवलकर, जितेंद्र भुते, गणेश शेंड्ये, मोटार असोसिएशनचे पदाधिकारी फैय्याज खतीब, नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी, नगरसेविका सौ. पूजा दीपक पवार, उद्योजक कौस्तुभ नागवेकर तसेच चिरायू हॉस्पिटलचे संचालक राकेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून गड-किल्ल्यांचे संवर्धन, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित करण्यात आला. यावेळी गडकिल्ले संवर्धनाची शपथ घेण्यात आली. तसेच ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्रांच्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. अतिशय उत्साही, प्रेरणादायी आणि भक्तिमय वातावरणात दीपोत्सव सोहळ्याची सांगता झाली.




