ठाण्याची अग्निसुरक्षा ‘रामभरोसे’; ६६१ पदे रिक्त, १७४ जवानांवर शहराची मदार! ६६१ पैकी ६०१ रिक्त पदांची भरती प्रक्रिया अद्यापही रखडली!

Fire safety of skyscrapers ‘Rambharose’ : रहेजा कॉम्प्लेक्समधील आगीच्या घटनेनंतर ठाणे शहरातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाची कुमक मागवावी लागल्याने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेतील मनुष्यबळाची कमतरता उघड झाली आहे.

शहरात टोलेजंग इमारतींची संख्या झपाट्याने वाढत असताना अग्निशमन दलातील मंजूर ८३५ पदांपैकी तब्बल ६६१ पदे रिक्त आहेत. अवघ्या १७४ जवानांवर शहराच्या अग्निसुरक्षेचा भार असून, ६६१ पैकी ६०१ रिक्त पदांची भरती प्रक्रिया अद्याप रखडली आहे. त्यामुळे गगनचुंबी इमारतींच्या ठाण्याची अग्निसुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरातील टोलेजंग इमारतींची उंची दिवसेंदिवस वाढत आहे. या इमारतींमध्ये लागणारी आग विजविण्यासाठी मात्र अग्निशमन दलाकडे पुरेसे जवान नाहीत. मंजूर ८३५ पदांपैकी तब्बल ६६१ पदे रिक्त असल्याने अवघे १७४ जवान संपूर्ण शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. म्हणजेच मंजूर मनुष्यबळाच्या केवळ २० टक्के कर्मचाऱ्यांवर अग्निशमन दलाचा कारभार सुरू आहे. गावदेवी मंडईतील आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाच्या मनुष्यबळाचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

मात्र, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. रविवारी रहेजा कॉम्प्लेक्समध्ये आग लागल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाला मुंबई अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक मागवावी लागली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील जवानांना पाचारण करण्यात आले. ठाण्यासारख्या मोठ्या शहराला आगीच्या दुर्घटनेचा सामना करण्यासाठी दुसऱ्या शहराच्या मदतीवर अवलंबून राहावे लागले, हे चित्र यानिमित्ताने दिसून आले. विशेष म्हणजे, ६६१ पैकी ६०१ रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होऊनही अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे शहरात उंच इमारतींचा विस्तार सुरू असताना अग्निशमन दलाचे मनुष्यबळ मात्र कागदावरच अडकल्याचे चित्र असून यामुळे सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामांचा भार वाढल्याचे दिसून येते.

१४ पैकी आठ केंद्रेच पूर्ण क्षमतेने

ठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात ५० मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या इमारती, मोठी गृहसंकुले आणि व्यावसायिक संकुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या वाढत्या शहरीकरणाच्या तुलनेत अग्निशमन दलाचे मनुष्यबळ वाढविण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. मंजूर ८३५ पदांपैकी ६६१ पदे रिक्त असून, केवळ १७४ कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील १४ अग्निशमन केंद्रांपैकी केवळ आठ केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. उर्वरित केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याचे पदही अनेक वर्षांपासून रिक्त असून, उपअग्निशमन अधिकारी अतिरिक्त जबाबदारी सांभाळत आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

७०८ पदांची नियुक्ती कधी

ठाणे अग्निशमन दलातील रिक्त आणि नवीन अशी एकूण ७०८ पदांची भरती प्रक्रिया महापालिका प्रशासनाने हाती घेतली. यामध्ये फायरमनची ३८१, सहाय्यक फायरमनची १३ आणि चालक-यंत्रचालकांची २०७ असे एकूण ६०१ तसेच अभियंता संवर्गातील १०७ अशी एकूण ७०८ पदे भरण्यात येणार आहेत. फायरमन पदासाठी होमगार्ड उमेदवारांना पाच टक्के समांतर आरक्षण लागू करण्याबाबत महापालिकेने काही महिन्यांपुर्वी शुद्धीपत्रक काढले होते. त्यानुसार १९ पदे होमगार्ड उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना आरक्षणाचा पर्याय निवडण्यासाठी अर्जात दुरुस्तीची संधी देण्यात आली होती. नव्याने पात्र होमगार्ड उमेदवारांनाही अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवांशी संबंधित अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील पदांची भरती प्राधान्याने करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. मात्र, अर्ज प्रक्रिया आणि शुद्धीपत्रकापलीकडे भरती पुढे सरकलेली नसल्याने प्रत्यक्ष नियुक्त्यांची प्रतीक्षा कायम आहे.

ठाणे अग्निशमन दलातील रिक्त तसेच नवीन अशा सर्व पदांची भरती प्रक्रीया राबविण्यात आली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच पद नियुक्ती होईल, अशी प्रतिक्रीया ठाणे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button