
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक; ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त
राजापूर पोलिसांची धडक कारवाई; २६ वर्षीय तरुणाला अटक
राजापूर : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तरुणाला राजापूर पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली आहे. रोहित शिवाजी खानविलकर (वय २६, रा. खडपेवाडी, राजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून दुचाकीसह गोवा बनावटीची दारू आणि दोन मोबाईल असा एकूण ८३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास राजापूर शहरातील गुजराळी दातार छापखाना ते साखळकरवाडी या मार्गावर करण्यात आली. आरोपी रोहित खानविलकर हा टीव्हीएस ज्युपिटर कंपनीच्या आकाशी रंगाच्या दुचाकीवरून (क्रमांक MH-08-BH-4768) कोणताही वैध परवाना नसताना गोवा बनावटीच्या विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीची दुचाकी, ७ हजार २०० रुपये किमतीचे ‘हेवर्ड्स फाईन व्हिस्की’चे पाच बॉक्स (प्रत्येक बॉक्समध्ये १८० मिलीच्या ४८ बाटल्या), तसेच ७ हजार ८२० रुपये किमतीच्या ‘मॅकडॉवेल्स नं. १’ कंपनीच्या गोवा बनावटीच्या दारूचे दोन बॉक्स (एका बॉक्समध्ये ४८, तर दुसऱ्या बॉक्समध्ये ४४ बाटल्या) जप्त केले.
याशिवाय ८ हजार रुपये किमतीचा ओप्पो एफ-१९ कंपनीचा सिल्व्हर रंगाचा मोबाईल आणि १० हजार रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी ए-३५ कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे. अशा प्रकारे एकूण ८३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश प्रकाश वारीक (बक्कल क्रमांक १६२५) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी रोहित खानविलकर याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) व (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.




