
सतेज पाटलांना मोठा धक्का! कोरमच्या खेळात महायुतीने बाजी मारली
कोल्हापूरची अस्मिता असलेल्या प्रसिद्ध ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे.निवडणुकीत समविचारी आघाडीकडे स्पष्ट बहुमत असतानाही, महायुतीने रणनीती आखत गोकुळ दूध संघावर आपला अध्यक्ष बसवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी १६ विरुद्ध १३ मतांनी निवड झाली आहे. फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि त्यांच्या समविचारी आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
अधिकृत घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक असली, तरी गोकुळच्या कार्यालयाबाहेर महायुतीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा मोठा उत्सव सुरू केला असून राजेश पाटील हेच नवे अध्यक्ष झाल्याचे जाहीर करून टाकले आहे.
राजेश पाटील (महायुती): १६ मते (विजयी)शशिकांत पाटील चुयेकर (समविचारी आघाडी): १३ मतेगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला १३ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाले होते, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. परंतु, अध्यक्ष निवडीच्या सभेची गणपूर्ती (कोरम) होण्यासाठी १४ सदस्यांची उपस्थिती आवश्यक होती.
हाच तांत्रिक मुद्दा पकडून २९ ऑक्टोबरच्या पहिल्या अध्यक्षपद निवडीच्या सभेला महायुतीच्या सर्व १२ संचालकांनी दांडी मारली, ज्यामुळे ती सभा तहकूब झाली.
त्यानंतर महायुतीचे १२ निर्वाचित संचालक आणि शासन नियुक्त ४ संचालक अशा एकूण १६ संचालकांची मते एकत्र आली. या १६ संचालकांच्या मतांच्या बळावर महायुतीने आपले बहुमत सिद्ध केले.गोकुळ दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश नरसिंगराव पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. गोकुळच्या सत्तासंघर्षात त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील ‘छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी’कडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.




