
मोदी सरकारकडून जनतेच्या पेट्रोलची चोरी, ई20 नव्हे तर 420 इंधन; राहुल गांधी यांचा हल्ला!
E 20 आता 420 बनले असून जनतेच्या गाड्यांमधून आता पेट्रोलची चोरी होत आहे, अशा शब्दांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांऐवजी 31 टक्क्यांपर्यंत इथेनॉल मिसळले जात असल्यावरून त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे.
कर्नाटक सरकारने 7 जिह्यांमध्ये विविध तेल कंपन्यांच्या पेट्रोलचे नमुने तपासले. त्यानुसार इंडियन ऑईलच्या एका नमुन्यात 31.2 टक्के इथेनॉलचे मिश्रण आढळले होते. इतर नमुन्यांमध्येही हे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा जास्त आढळले. यावरून कर्नाटक सरकारने मोदी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यानंतर आज राहुल गांधी यांनीही प्रमाणापेक्षा जास्त इथेनॉल मिश्रणावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘एक्स’वर टाकलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण जास्त असल्यामुळे वाहनांचे मायलेज कमी होऊ शकते तसेच वाहनांच्या देखभालीचाही खर्च वाढू शकतो. लोक महागडय़ा पेट्रोलसाठी पैसे मोजत आहेत, मात्र, त्यांच्या गाड्यांमध्ये इथेनॉल भरले जात आहे. एवढय़ा प्रमाणातील इथेनॉलसाठी गाड्या बनविण्यात आलेल्या नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
ग्राहकांसमोर कोणताच पर्याय नाही
14 पैकी 11 नमुन्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल आढळले आहे. तुमच्या गाडीत कोणते पेट्रोल टाकले जात आहे, त्यामध्ये इथेनॉलचे प्रमाण किती आहे, याची माहिती पेट्रोल पंपावर दिली जात नाही. ग्राहकांसमोर पेट्रोल निवडण्याचा कोणताच पर्याय नाही. जास्त इथेनॉलमुळे नुकसान लोकांचेच होत आहे. पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात किती इथेनॉल मिसळण्यात येत आहे आणि 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कधी होणार, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.




