महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया!

NCP Happening : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे या नेत्यांनी शरद पवारांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. तसेच दिवंगत उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी बैठका झाल्याचं वृत्त सुनील तटकरे यांनी फेटाळलं होतं. पण आता सुनील तटकरे यांनी अचानक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात यासाठी अजितदादा हयात असताना बैठका झाल्या होत्या, असं मान्य केलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांवर भूमिका मांडली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशी दोन पक्ष आहेत. हे दोन्ही स्वतंत्र पक्ष आहेत. या दोन्ही पक्षांचे निर्णय ते मिळून घेतील. इकडे शरद पवारांसारखे मोठे नेते आहेत. तिकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणं योग्य होणार नाही. त्यांचे निर्णय ते घेतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“एवढं निश्चित मला माहिती आहे की, समजा असा काही निर्णय घ्यायचा असेल किंवा अशा काही चर्चा असतील ते आम्हालाही सांगतील. कारण एनडीएचे मोठो पार्टनर आम्ही आहोत. त्यामुळे आजतरी याबाबत दोघांनी आम्हाला सांगितलेलं नाही, अद्याप तरी त्यांनी अशा काही चर्चा चालू असल्याचं सांगितलेलं नाही. चर्चा चालल्या तर आम्ही सांगू. आम्हाला सांगितलं तर आम्ही प्रतिक्रिया देऊ”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महत्त्वाची माहिती दिली. “आम्ही सर्व मंत्र्यांनी हा निर्णय घेतला की, या वर्षाची दिवाळी आपण शेतकऱ्यांसोबत साजरी केली पाहिजे. राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना किमान धीर देणं. शासन त्यांच्यासोबत आहे, आम्ही सगळे त्यांच्याप्रती संवेदनशील आहोत. हा भाव निर्माण झाला पाहिजे या दृष्टीने आम्ही हे ठरवलं आहे. मी देखील आज एका गावात चाललो आहे. त्या ठिकाणीच थांबणार आहे. आज आणि उद्या शेतकऱ्यांसोबत संवाद करणं, गप्पा मारणं आणि एकप्रकारे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करायची अशाप्रकारचा हा कार्यक्रम आहे. आमचे सगळेच मंत्री कुठल्या ना कुठल्या गावात जावून शेतकऱ्यांसोबत अशा पद्धतीने दिवाळी साजरी करतील”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button