चिपळूण तालुक्यात दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी ‘मिशन वनराई बंधारे’; मुरतवडे येथे लोकसहभागातून ५ बंधारे पूर्ण


रत्नागिरी, दि. ७ ): ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा कोकणात पावसाचे प्रमाण कमी राहिले असून संभाव्य पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभाग आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. ओढे, नद्या आणि नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी चिपळूण उपविभागात ‘मिशन वनराई बंधारे’ ही मोहीम जोमाने राबवली जात आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील मुरतवडे येथे लोकसहभागातून ५ वनराई (विजय) बंधारे यशस्वीरित्या बांधण्यात आले आहेत, अशी माहिती चिपळूणचे उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
मुरतवडे गावामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत कार्यरत असलेला ‘हनुमान सेंद्रिय शेती गट’, पाणी फाउंडेशन अंतर्गत ‘वसुंधरा शेतकरी गट’, मुरतवडे ग्रामपंचायत आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून हे पाच वनराई बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमासाठी लागणारा प्लास्टिक कागद सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) खडपोली येथील ‘कृष्णा ॲन्टिऑक्सिडंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि लोटे येथील ‘घरडा केमिकल्स’ या कंपन्यांनी उपलब्ध करून दिला.
पिण्याच्या पाण्यासह रब्बी पिकांना होणार थेट फायदा
या बंधाऱ्यांमुळे परिसरातील जलस्रोतांना मोठा दिलासा मिळणार आहे:
विहिरींच्या पाणीपातळीत वाढ
बंधाऱ्याच्या लगतच ग्रामपंचायतीची नळ पाणी पुरवठ्याची विहीर असून, बंधाऱ्यामुळे पाणी जिरून विहिरीची पातळी उन्हाळ्यातही टिकून राहण्यास मदत होईल.
अडवलेल्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिके तसेच कडधान्यांची लागवड करणे शक्य होणार आहे.
“यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. वाहून जाणारे पाणी जागच्या जागी अडवणे ही काळाची गरज असून मुरतवडेप्रमाणेच तालुक्यातील इतर गावांतील ग्रामस्थांनीही एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधावेत.”
— शिवाजी शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी, चिपळूण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button