गिम्हवणे मुख्य मार्गावर गतिरोधक बसवण्याची मागणी


दापोलीः- गिम्हवणे पेट्रोल पंपासमोर मुख्य रस्त्यावरील अतितीव्र आणि धोकादायक वळण अपघातांचे केंद्र बनत आहे. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे वळणावर गतिरोधक बसवण्यासह सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
दापोली पेट्रोलपंपातर्फे यासंदर्भात ग्रामपंचायत गिम्हवणे, सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक पोलिस विभाग दापोली यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरातून गिम्हवणेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पेट्रोलपंपासमोर असलेले हे वळण अत्यंत तीव्र असल्याने वाहनचालकांना येथे वाहने नियंत्रित करणे कठीण जाते. विशेषतः वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. नुकत्याच येथे झालेल्या अपघातात एका युवकाला जीव गमवावा लागला. एक निष्पाप बळी गेल्यानंतरही प्रशासनाने या धोकादायक ठिकाणी उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या वळणावर गतिरोधक बसवणे, सूचना व दिशादर्शक फलक लावून सुरक्षाव्यवस्था उभारणे गरजेचे आहे. संबधित विभागांनी निवेदनाची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि अपघात रोखण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button