जेएसडब्ल्यू कामगारांचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित


प्रशासनाच्या मध्यस्थीने मागण्यांवर सकारात्मक तोडगा; लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता


रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील स्थानिक कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या तसेच परिसरातील कथित बेकायदेशीर गॅस टर्मिनलच्या धोक्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी प्रशासनाच्या मध्यस्थीने तूर्तास स्थगित करण्यात आले. प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ३ नोव्हेंबरच्या रात्री उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रहार कामगार संघटना आणि जेएसडब्ल्यू कंपनी व्यवस्थापनाची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या सेवाज्येष्ठतेनुसार कायमस्वरूपी नियुक्ती, शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे उच्च श्रेणीत समावेश, वेतनवाढ आणि बोनस यांसह विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कामगारांच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने पत्रव्यवहार करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच कामगारांच्या विविध श्रेणींमध्ये समानता आणण्याच्या मागणीवरही गांभीर्याने विचार करण्याचे मान्य करण्यात आले.

दरम्यान, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने मध्यस्थी करत कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेमध्ये चर्चा घडवून आणली.

बुधवारी सायंकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून प्रहार कामगार संघटनेला मागण्यांबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट करणारे अधिकृत पत्र देण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विकास पाटील आणि जयगड दूरक्षेत्राचे निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली.

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले, तरी आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button