
शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते; केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सुप्रिया सुळे यांना संधी मिळू शकते – केंद्रीय मंत्री रामदास आठवले!
पुणे : २०१९ मध्ये शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. अजित पवार यांनीही शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) येण्याचे आवाहन केले होते; मात्र त्यांनी ते ऐकले नाही.
तसेच, केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची शक्यता असून, या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांना स्थान मिळू शकते, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. सुप्रिया सुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आल्या तर आम्हाला आनंदच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद बुधवारी ठाण्यात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रवेशाबाबत विचारले असता, पवार आघाडीत येतील असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ते राष्ट्रपती झाले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. अजित पवार यांनीही शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले होते; मात्र त्यांनी ते ऐकले नाही, असे आठवले म्हणाले.
सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रवेशाबाबत सकारात्मक भूमिका मांडताना, त्या आघाडीत आल्या तर आनंद होईल, असे त्यांनी नमूद केले. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि मतपत्रिकेच्या मुद्द्यावर बोलताना, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यास आमचा विरोध नसल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. मात्र, ईव्हीएम मोदी यांनी आणलेले नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. २०२९ च्या निवडणुकीत आम्हाला यश मिळाले नाही, तर राहुल गांधी यांचे अभिनंदन करू. जनता जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच पूर्णेकर प्रकरणात कोणावरही अन्याय होऊ नये आणि पोलिसांनी निष्पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी केली.




