
पाच राज्यांमध्ये २.२९ कोटी मतदार बाद; पुढील वर्षी विधानसभा निवडणुकांपूर्वी आकडेवारी जाहीर!
पीटीआय, नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये मतदारयाद्यांची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहीम पूर्ण झाल्यानंतर १३.२४ टक्के मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.
निवडणूक आयोग आणि संबंधित राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. या पाचही राज्यांमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत.
‘एसआयआर’ मोहीम राबवण्यापूर्वी या पाच राज्यांमध्ये एकूण १८.७१ मतदार होते, ते कमी होऊन १६.४३ कोटी इतके राहिले आहेत. एकूण २.२९ कोटी (१२.२ टक्के) मतदारांची नावे मतदारयाद्यांमधून वगळण्यात आली आहेत. यापैकी ९० टक्के मतदार एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात ‘एसआयआर’ मोहीम पार पडली. ‘एसआयआर’पूर्वी राज्यात १५.४४ कोटी मतदार होते. प्रारूप मतदारयाद्यांमधील मतदारांची संख्या १२.५६ कोटी तर अंतिम मतदारयाद्यांमधील संख्या १३.४० कोटी इतकी होती. या राज्यात २.०४ कोटी मतदारांची नावे बाद ठरली आहेत. पाच राज्यांमधील बाद मतदारांची ही सर्वात मोठी संख्या आहे.
पंजाबमध्ये तिसऱ्या टप्प्यात ‘एसआयआर’ मोहीम राबवण्यात आली. ‘एसआयआर’पूर्वी २.१५ कोटी मतदारसंख्या प्रारूप यादीत १.९४ कोटी होती आणि अंतिम मतदारयाद्यांमध्ये २.०१ कोटी मतदार उरले आहेत. एकूण १४ लाख, म्हणजे ६.३४ टक्के मतदार वगळण्यात आले आहेत. या राज्यात मतदारयाद्यांमधून वगळलेले ३४ टक्के मतदार पुन्हा समाविष्ट करण्यात आले.
तिसऱ्या टप्प्यात उत्तराखंडमध्ये झालेल्या ‘एसआयआर’नंतर ८० लाख मतदारांपैकी आठ लाख मतदारांना वगळण्यात आले आहे. मणिपूरमध्ये २० लाख मतदारांपैकी ३.४ लाख मतदार बाद ठरले आहेत. तर गोव्यात ११.८५ लाखांपैकी सुमारे १०.७६ टक्के मतदारांची नावे वगळण्यात आली असून अंतिम यादीत १०.५८ लाख इतके मतदार उरले आहेत.
निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक
उत्तर प्रदेश (४०३) – एप्रिल-मे २०२७
पंजाब – फेब्रुवारी-मार्च २०२७
उत्तराखंड – फेब्रुवारी-मार्च २०२७
मणिपूर (६०) – फेब्रुवारी-मार्च २०२७
गोवा (४०) – फेब्रुवारी-मार्च २०२७



