
रत्नागिरी जिल्ह्यात ९१.३० टक्के बालके सामान्य पोषण श्रेणीत
*रत्नागिरी, दि. २८ जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या संख्येबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने अधिकृत आकडेवारीसह खुलासा सादर केला आहे. प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये तीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांची दिलेली आकडेवारी चुकीची असून, जिल्ह्यातील बहुतांश बालके सर्वसाधारण (निरोगी) पोषण श्रेणीत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे.
वृत्तांमध्ये तीव्र कुपोषित (SAM) श्रेणीत ३९० बालके आणि मध्यम तीव्र कुपोषित (MAM) श्रेणीत २,९५२ बालके नोंद असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सप्टेंबर २०२६ अखेरच्या अधिकृत सर्वेक्षणातील वास्तव आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
- एकूण सर्वेक्षण: जिल्ह्यातील २,८१२ कार्यरत अंगणवाड्यांमधील ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण ४२,८७२ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले.
- सर्वसाधारण पोषण श्रेणी: यापैकी तब्बल ३९,१४९ बालके (९१.३०%) सर्वसाधारण पोषण श्रेणीत आहेत.
- तीव्र कुपोषण (SAM): जिल्ह्यात तीव्र कुपोषित श्रेणीत केवळ ३३ बालके (०.०८%) नोंदविण्यात आली आहेत.
- मध्यम तीव्र कुपोषण (MAM): मध्यम तीव्र कुपोषित श्रेणीत ५१४ बालके (१.१९९%) आढळली आहेत.
आरोग्य व पोषणविषयक उपाययोजनांवर भर
जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग तसेच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून कुपोषण निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानांतर्गत कुपोषित बालकांची वेळेवर ओळख पटवून त्यांना नियमित आरोग्य तपासणी, औषधोपचार, लोहयुक्त सिरप वाटप आणि सकस आहारविषयक मार्गदर्शन केले जात आहे.
जिल्ह्यातील कुपोषणाच्या स्थितीचा विचार करताना केवळ कुपोषित बालकांची संख्या न मांडता, एकूण सर्वेक्षित बालकांची संख्या आणि ९१ टक्क्यांहून अधिक बालके सामान्य पोषण श्रेणीत असल्याचे सकारात्मक चित्र जनतेसमोर येणे आवश्यक आहे.




