
पेट्रोल पंपांवरील शौचालयांच्या स्वच्छतेसाठी सरकारी तेल कंपन्यांचा पुढाकार!; QRकोडद्वारे ग्राहकांच्या अभिप्राया वर लक्ष
नवी दिल्ली:- पेट्रोल पंपांवर इंधन भरण्या सोबतच ग्राहकांना स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांनी शौचालयांच्या स्वच्छतेवर देखरेख वाढवली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या ‘स्वच्छता अभियाना’अंतर्गत वरिष्ठ अधिकारी स्वतः विविध इंधन केंद्रांना भेट देऊन शौचालयांची स्वच्छता, देखभाल आणि ग्राहक सुविधांचा आढावा घेत आहेत. या सुविधांबाबत ग्राहकांचे मत जाणून घेण्यासाठी क्यूआर कोडच्या माध्यमातून अभिप्राय गोळा करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या विपणन विभागातील वरिष्ठ अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. इंडियन ऑइलचे संचालक (विपणन) सौमित्र प्रिया श्रीवास्तव यांनी मुंबईतील कोको बीकेसी आणि ३ स्टार इंधन केंद्रांना भेट देऊन तेथील शौचालयांच्या स्वच्छतेची पाहणी केली. ग्राहकांना अभिप्राय नोंदवता यावा, यासाठी उभारण्यात आलेल्या ‘दर्पण’ क्यूआर कोड प्रणालीचेही त्यांनी कौतुक केले. ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात, असे श्रीवास्तव यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये नमूद केले.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (विपणन) शुभंकर सेन यांनी नवी दिल्लीतील बीपी शांतीपथ पेट्रोल पंपाला भेट देऊन कंपनीच्या ‘ड्राइव्हफ्रेश’ शौचालय सुविधांची आणि ग्राहक अनुभव प्रणालीची पाहणी केली. या वेळी त्यांनी ‘ताजे राहा, ताजी गाडी चालवा’ हा स्वच्छतेचा संदेश दिला.
या मोहिमेचा विस्तार विविध शहरांतील पेट्रोल पंपांपर्यंत करण्यात आला आहे. इंडियन ऑइलच्या वरिष्ठ रिटेल अधिकाऱ्यांनी कोलकाता, इंदूर, जबलपूर आणि रेवा येथील इंधन केंद्रांवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थेची तपासणी केली. तसेच ग्राहकांशी संवाद साधून त्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांबाबतचे अनुभव जाणून घेतले.
पेट्रोलियम कंपन्यांच्या माहितीनुसार, शौचालये स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतंत्र सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती, सेन्सरच्या माध्यमातून देखरेख आणि क्यूआर कोडद्वारे मिळणाऱ्या ग्राहकांच्या अभिप्रायाचा उपयोग केला जात आहे. ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करून सुविधांना रेटिंग देता येते, तसेच स्वच्छतेबाबतच्या तक्रारी आणि सुधारणा सुचवता येतात. या अभिप्रायामुळे त्रुटी शोधून त्यावर वेळेत सुधारात्मक उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
शौचालये केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाहणीच्या वेळी स्वच्छ असणे पुरेसे नसून, प्रत्यक्ष वापराच्या वेळीही प्रत्येक प्रवाशाला स्वच्छ आणि आरामदायक सुविधा मिळणे आवश्यक आहे, यावर कंपन्यांनी भर दिला आहे. विशेषतः लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी स्वच्छ शौचालये ही मूलभूत गरज आहे. पेट्रोल पंपांवर उपलब्ध असलेल्या अशा सुविधांवरून ग्राहक सेवांची गुणवत्ता दिसून येते.
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ग्राहकांच्या अनुभवावर केवळ इंधनाची उपलब्धता नव्हे, तर पेट्रोल पंपावरील स्वच्छता आणि सुविधांची गुणवत्ता यांचाही परिणाम होतो. त्यामुळे स्वच्छतेचा उपक्रम केवळ विशेष मोहिमेपुरता मर्यादित न ठेवता नियमित व्यवस्थापन आणि उत्तरदायित्वाचा भाग बनवण्याच्या दृष्टीने सरकारी तेल कंपन्यांचे हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.




