
खेडमध्ये २० कोटींचा ‘उमेद मॉल’ उभारणार; महिला बचतगटांना मिळणार हक्काची बाजारपेठ!
रत्नागिरी जिल्ह्यातील १५ हजार ७०० बचतगटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी; १९ कोटी ९८ लाख ९७ हजारांचा निधी मंजूर
खेड : महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खेड येथे ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने १९ कोटी ९८ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर हा मॉल उभारण्यात येणार असून, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं-सहाय्यता समूह, ग्रामसंघ, उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला हापूस आंबा, काजू, कोकम, जांभूळ, सुपारी, मत्स्यप्रक्रिया उत्पादने, भात, नाचणी तसेच विविध स्थानिक हस्तकलांच्या उत्पादनांची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र, महिला बचतगटांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रामुख्याने हंगामी प्रदर्शने, स्थानिक आठवडे बाजार आणि तात्पुरत्या स्टॉलवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे उत्पादनांची विक्री, योग्य दर आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या संधी मर्यादित राहतात.
ही परिस्थिती बदलण्यासाठी उमेद मॉलच्या माध्यमातून उत्पादनांचे दर्जीकरण, आधुनिक पॅकेजिंग, ब्रँडिंग, साठवणूक आणि वर्षभर विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळण्यासह त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १५ हजार ७०० स्वयं-सहाय्यता समूह, १ हजार ९४ ग्रामसंघ, ५५ प्रभागसंघ, ५३० उत्पादक गट आणि १९ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून एकूण १ लाख ७० हजार ७१३ महिला संघटित झाल्या आहेत.
इतक्या मोठ्या संख्येने महिला ग्रामीण अर्थव्यवस्थेत योगदान देत असताना, त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक आहे. उमेद मॉलमुळे या महिलांना आपल्या उत्पादनांचे थेट प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. स्थानिक उत्पादनांना स्वतंत्र ओळख मिळवून देणे आणि ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेला चालना देणे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
खेड येथे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर उमेद मॉलची इमारत उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या अंदाजपत्रकात इमारतीच्या बांधकामासह अंतर्गत सजावट, फर्निचर, उत्पादनांच्या साठवणुकीसाठी व प्रदर्शनासाठी रॅक, बिलिंग काऊंटर, वातानुकूलन यंत्रणा आणि तीन लिफ्ट यांचा समावेश आहे.
याशिवाय सौरऊर्जा निर्मिती, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि अग्निशमन यंत्रणेसाठीही तरतूद करण्यात आली आहे. महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रसाधनगृह आणि विश्रांती कक्ष, तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्प व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.
उमेद मॉलचे बांधकाम सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. बांधकामाच्या प्रगतीचा त्रैमासिक अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे.
उमेद मॉलमुळे बचतगटांच्या उत्पादनांना केवळ विक्रीचे ठिकाण मिळणार नाही, तर त्यांना दर्जेदार उत्पादननिर्मिती, आकर्षक पॅकेजिंग आणि स्वतंत्र ब्रँड विकसित करण्यासाठीही चालना मिळू शकते. स्थानिक उत्पादनांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचविण्याची संधी निर्माण झाल्यास ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ मिळेल. त्यामुळे खेडमध्ये उभारण्यात येणारा उमेद मॉल हा महिला बचतगटांसाठी आर्थिक प्रगतीचे नवे दालन ठरण्याची अपेक्षा आहे.




