
काटवली येथे बंधाऱ्यात मासेमारी करताना बुडून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथे नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात बुडून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.२१) घडली.
प्रकाश अर्जुन गेल्ये (वय ५४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मासेमारीसाठी गेले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे काटवली गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश गेल्ये हे बुधवारी नेहमीप्रमाणे नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेले होते. यावेळी बंधाऱ्यातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. पाण्यातून बाहेर पडण्याची संधी न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी शोधमोहीम राबवून प्रकाश गेल्ये यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




